!! जय भोईराज !! भोईसमाज सेवेसाठी, युवकांचे संघटिकरणासाठी तसेच जेष्ठ मार्गदर्शकांच्या पथदर्शनाने युवकांनी उभारलेले, युवकांचे, युवा व्यासपिठ भोईसमाज युवा मंच...
Monday, July 6, 2026
लग्न जुळवणारे मध्यस्थी आज मागे का सरकत आहेत
लग्न जुळवणारे मध्यस्थी आज मागे का सरकत आहेत..?
*🥸एकेकाळी गावातील ज्येष्ठ, नातेवाईक किंवा मान्यवर मंडळी लग्न जुळवण्याची जबाबदारी आनंदाने घेत असत. त्यांच्या शब्दाला किंमत होती आणि दोन्ही कुटुंबे त्यांचा सन्मान करत. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनेक ठिकाणी "पाहू", "बघू", "जमलं तर सांगतो" अशी उत्तरे मिळतात; प्रत्यक्षात मात्र कोणी पुढाकार घेत नाही.*
*👉यामागचे कारण शोधले तर एक कटू वास्तव समोर येते. मध्यस्थीचे काम करताना व्यक्ती फक्त दोन्ही कुटुंबांना एकत्र आणते, निर्णय मात्र मुलगा-मुलगी आणि त्यांचे पालक घेतात. तरीही लग्नानंतर काही वाद, मतभेद, विभक्त राहणे किंवा इतर समस्या उद्भवल्या तर सर्वप्रथम बोट मध्यस्थीवरच उचलले जाते.*
👉"तुम्ही नीट चौकशी केली नव्हती", "तुम्ही खरी माहिती सांगितली नाही", "तुमच्यामुळे आमची फसवणूक झाली" अशी वाक्ये ऐकावी लागतात. लग्न जुळल्यावर कौतुक कोणी करत नाही, पण काही बिघडले तर दोष मात्र मध्यस्थीच्या माथी मारला जातो. त्यामुळे अनेक अनुभवी आणि सज्जन लोकांनी या कामापासून स्वतःला दूर ठेवणे पसंत केले आहे.
👉वास्तविक पाहता, लग्न ही दोन सज्ञान व्यक्ती आणि दोन कुटुंबांची जबाबदारी असते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण चौकशी, पडताळणी आणि विचार करणे हे मुलगा-मुलगी व त्यांच्या पालकांचे कर्तव्य आहे. मध्यस्थ हा फक्त एक दुवा असतो, हमीदार नाही.
👉आज समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे — जर प्रत्येक चुकीसाठी मध्यस्थीलाच दोष देणार असू, तर उद्या कोण पुढे येऊन दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करेल..?
👉मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींना दोषीच्या पिंजऱ्यात उभे करण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांचा आदर केला पाहिजे. अन्यथा समाजातील ही महत्त्वाची परंपरा हळूहळू संपुष्टात येईल आणि "चांगले स्थळ शोधणे कठीण आहे" अशी तक्रार करणारेच लोक त्यासाठी स्वतः जबाबदार ठरतील.
🚩मध्यस्थीचा सन्मान करा; कारण नाती जोडणे सोपे असते, पण तुटलेली नाती जोडणे फार कठीण असते.
धन्यवाद....🙏🏻
आपला एक समाज बांधव
Subscribe to:
Posts (Atom)