भोई समाजाविषयी थोडेसे

भोई समाज हा महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र,विदर्भ, मुंबई,पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हे व इतरत्र सर्व जिल्ह्यात आढळतो. मासेमारी हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात. तर घाटावरचे भोई गोड्यापाण्यात म्हणजे नदी, तलाव इत्यादीमध्ये मासेमारी करतात. भोई समाजाचे उदरनिर्वाहाचे अन्य प्रमुख साधन म्हणजे दाळे, फुटाणे, बत्तासे, शेवचिवडा बनवणे व विकणे आणि नदीकाठी डांगर, खरबूज, टरबूजांचे पीक घेऊन त्यांची विक्री करणे.

भोई समाजाच्या देशभरात ३२ जाती-पोटजाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात २६ जाती, पोटजाती आढळून येतात. केवट, कहार, किरात, खाडी भोई, खारे भोई, गाढव भोई, गोंडिया, झिंगा भोई, जातिया, ढिवर, ढेवरा, धीवर, धीमर, धुरिया, नावाडी, परदेशी भोई, पालेवार, बोई, भोई, मछंद्र, मछुआ, मल्हार, मल्हाव, मांझी, राज भोई, अशा भोई समाजाच्या जाती आणि पोटजाती आहेत. महाराष्ट्रात कहारू, जालिया, झिंगा, दुराया, नावाडी, परदेशी, पालेवार, मच्छिंद्र, राज, या आणि अशा एकूण २६ उपजाती या समाजात आहेत. सरकारदृष्ट्या भोई समाज हा देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गांत समाविष्ट आहे. काही राज्यांत भोई समाज अनुसूचित जातीत, तर काही राज्यात अनुसूचित जमातीमध्ये गणला जातो. महाराष्ट्रात भोई समाजाला अन्य भटक्या जातीमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी (अदर बॅकवर्ड क्लास)'तसेच महाराष्ट्रात (NT)Nomadic Tribeमध्ये सामील आहे.

मासळी विक्रीच्या व्यवसायात भोई समाजाचा पूर्वापार मोठा सहभाग असला, तरी आता हे प्रमाण २५ टक्के इतके झाले आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत. शिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्धीमुळे विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आणि अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून विविध क्षेत्रांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रशासन, व्यापार, वकिली, वैद्यकीय, साहित्य, कला अशा क्षेत्रात या मंडळींनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.

समस्त भोई पंच मंडळी ही समाजाची शिखर संस्था आहे. धार्मिक विधी, तंटामुक्ती, शैक्षणिक महत्त्व, गणेशोत्सव, दहीहंडी संघ, व्यायामशाळा, जीवरक्षक सेवा, स्वतंत्र वारकरी दिंडी, वधू-वर मेळावा असे अनेक समाजोपयोगी उपक्रम, ज्ञाती संस्थेतर्फे चालवले जातात. महाराष्ट्रातील इतर अठरा पगड जाती-जमातींच्या तुलनेत हा समाज प्रगतीच्या तुलनेत थोडा मागे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या काळात नामवंतांच्या पालख्या उलण्याचे काम भोई करत असत. आजही भोई समाजाला पालखी उचलण्याचा मान सर्वप्रथम मिळतो.

माहिती संकलन: श्री.किशोर शिवदे
प्रदेश उपाध्यक्ष भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
संदर्भ.विकिपीडिया

1 comment:

  1. अतिशय उपयुक्त अशी माहीती.. आपल्या भोई समाजाची... जय भोईराज।।।।

    ReplyDelete

🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩